प्लुटोला पृथ्वीवासीयांची महादशा
बाब्या – ग्रह म्हणजे काय रे भाऊ?
भाऊ – ग्रह म्हणजे सूर्याभोवती फिरणारी वस्तू.
बाब्या – मग लघुग्रहांना ग्रह का म्हणत नाहीत?
भाऊ – लघुग्रह हे समूहाने एका विशिष्ट पट्ट्यामध्ये सूर्याभोवती फिरतात. स्वतंत्रपणे नाहीत, म्हणून.
बाब्या – पण प्रत्येक लघुग्रहाची स्वतःची अशी स्वतंत्र कक्षा असतेच की.
भाऊ – लघुग्रहांची कक्षा आजूबाजूच्या लघुग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाने सतत आणि मोठ्या प्रमाणात बदलत राहते. शिवाय लघुग्रह आकाराने फार छोटे असतात. लघुग्रह म्हणजे थोड्या मोठ्या आकाराचे दगडच. ते कसेही ओबडधोबड असतात, गोलाकार नसतात.
बाब्या – मग चंद्राला ग्रह का म्हणत नाहीत? तो आहे की गोलाकार! आणि लघुग्रहांपेक्षा मोठाही आहेच. शिवाय पृथ्वीभोवती फिरता फिरता तो सूर्याभोवतीही फिरतोच की!
भाऊ – अरे, पण तो पृथ्वीचा उपग्रह आहे. तो स्वतंत्रपणे सूर्याभोवती फिरत नाही. तो पुथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी सूर्याभोवती, म्हणून तो सूर्याभोवती फिरतो. शिवाय सध्या आपण ज्यांना ग्रह म्हणतो ते ग्रह साधारण एकाच प्रतलामध्ये सूर्याभोवती फिरतात. चंद्राची कक्षा ह्या प्रतलामध्ये नाही.
बाब्या – पण प्लुटोची कक्षा कुठे ह्या प्रतलामध्ये आहे? शिवाय प्लुटो कधी नववा ग्रह असतो तर कधी आठवा!!
भाऊ – प्लुटोची कक्षा नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणामुळे बदलते, त्यामुळे असं होतं. पण प्लुटो गोल आहे आणि सूर्याभोवती स्वतंत्र कक्षेत फिरतो.
बाब्या – म्हणजे हे बरं आहे!! लघुग्रहांना ज्या कारणांमुळे ग्रह म्हणायचं नाही त्याच कारणांमुळे प्लुटोला मात्र ग्रह म्हणायचं! आणि सूर्याभोवती फिरण्याचाच मुद्दा असेल तर धूमकेतूही फिरतोच की सूर्याभोवती! मग त्याला ग्रह का म्हणायचं नाही?
भाऊ - सगळेच धूमकेतू सूर्याभोवती सतत फिरत राहात नाहीत. काही एकदा येतात आणि कायमचे गायब होतात. हॅलेसारखे अगदी थोडे फिरत राहतात. शिवाय आपल्या नऊ ग्रहांची कक्षा लम्बवर्तुळाकार आहे. साधारणतः धूमकेतूंची कक्षा लंबवर्तुळाकार नसते.
बाब्या – हम्म….. पण हे सगळे आपल्या सूर्यमालेमधले ग्रह. बाकीच्या सौरमालांमध्ये असलेल्या कोणत्या वस्तूला ग्रह म्हणायचं आणि कोणत्या नाही हे कस ठरवायचं?
भाऊ - मला माहीत नाही रे. तू आपला इंटरनॅशनल ऍस्ट्रोनमिकल युनियनला विचार कसा!!
इंटरनॅशनल ऍस्ट्रोनमिकल युनियननेही परिपूर्ण, सर्वसमावेशक आणि योग्य अशी ग्रहाची व्याख्या आजपर्यंत केली नव्हती. ऑगस्ट २००६ मध्ये खगोलविदांचा मोठा परिसंवाद प्राग येथे भरला होता. ह्या परिसंवादामध्ये प्लुटोच्या ग्रहविषयक दर्जाविषयी बराच उहापोह झाला. प्लुटोला ग्रह म्हणावे वा नाही, सौरमालेमध्ये त्याला ग्रह म्हणून स्थान असावे वा नाही ह्या विषयावर खगोलविदांनी मतदान केले. ह्या मतदानाच्या निकालानुसार प्लुटोचा ग्रहदर्जा काढून घेण्यात आला. प्लुटोच्या अनुषंगाने “ग्रह कशाला म्हणावे” ह्याबद्दलही ह्या परिसंवादामध्ये चर्चासत्रे झडली. इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने ह्या परिसंवादा आधी काही ग्रहाची तात्पुरती परंतु बयाच प्रमाणात समेशक अशी व्याख्या केली होती. ह्या व्याख्येनुसार ग्रहांना इतर सौरमालीय वस्तूंपासून वेगळे करण्याची व्यवस्था झाली होती. ही व्याख्या करताना ग्रहाप्रमाणेच उपग्रहाचीही नेमकी व्याख्या केली होती. ह्या ग्रह आणि उपग्रहाच्या व्याख्येनुसार प्लुटोचा ग्रहदर्जा तर कायम राहिला असताच, परंतु, आजपर्यंत आपण ज्या शॅरनला प्लुटोचा उपग्रह समजत होतो, त्यालाही स्वतंत्र ग्रहाचा दर्जा मिळाला असता.
त्यावेळी ग्रहाची आवृत्ती व्याख्या (Draft Definition) अशी केली होती- ”अवकाशस्थ वस्तू, जी ता-याभोवती फिरते, मात्र जी स्वतःच तारा नाही आणि दुस-या ग्रहाचा उपग्रहही नाही, जिचे वस्तुमान द्रवस्थैतिक स्थैर्य (Hydrostatic Equilibrium) मिळवण्याएवढे असल्याने तिला गोलाकार/गोलसदृश (Spherical / Spheroid) आकार प्राप्त झाला आहे” अशा वस्तूला ग्रह (planet) असे म्हणावे. उपग्रहाची आवृत्ती व्याख्या अशी होती - ”ग्रहसदृश वस्तू जी एखाद्या ग्रहाभोवती फिरते आणि फिरताना ती वस्तू आणि तो ग्रह ह्या संयुक्त संस्थेचा (system) गुरुत्वमध्य (Center of Gravity) हा त्या ग्रहामध्ये असतो, अशा वस्तूला त्या ग्रहाचा उपग्रह (Satellite) असे म्हणावे.
आता ह्या दोन्ही आवृत्ती व्याख्या विस्ताराने पाहू. ह्या व्याख्या संपूर्णपणे समजावून घेण्यासाठी आपल्याला द्रवस्थैतिक स्थैर्य आणि गुरुत्वमध्य ह्या संकल्पना समजावून घ्याव्या लागतील. ग्रह तयार होताना अवकाशातील धूळ्, वायू एकत्र येऊन एका केंद्राभोवती फिरायला लागतात. ह्या फिरणा-या गोळ्याचे वस्तुमान जेवढे जास्त तेवढे त्याचे गुरुत्वाकर्षण बल (gravitational force) अधिक. ह्या स्वगुरुत्वाकर्षणाच्या परिणामामुळे ह्या धूळ आणि वायूच्या गोळ्यातील प्रत्येक कण हा केन्द्राच्या दिशेने ओढला जातो. गुरुत्वाकर्षण हे केंद्रापाशी सर्वात अधिक असल्यामुळे तेथे ह्या वायूंचा दाब सर्वाधिक असतो, तर जसजसे केंद्रापासून दूर जावे तसतसा हा दाब कमी होत जातो. ह्या दाबातील बदलामुळे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच केंद्रापासून बाहेरच्या दिशेने असे एक बल कार्यरत होते, ज्याला दाबफरक बल (pressure gradient force) म्हणतात. केंद्रगामी गुरुत्वाकर्षण बल आणि बाह्यगामी दाबफरक बल ह्यातील तोल साधला केला की त्या वस्तूला द्रवस्थैतिक स्थैर्य (hydrostatic equilibrium) प्राप्त झाले असे समजतात. ह्या स्थितीमध्ये त्या वस्तूतील प्रत्येक कण हा केंद्राच्या दिशेने सारख्याच प्रमाणात ओढला जात असल्याने त्या वस्तूला जवळपास गोलाकार प्राप्त होतो. वस्तूचे वस्तुमान जेवढे जास्त तेवढी गोलाकार प्राप्त होण्याची शक्यता अधिक. सर्वसाधारणपणे ५ x १०२२ किलोग्रॅम पेक्षा अधिक वस्तुमान आणि ८०० किलोमीटर पेक्षा अधिक व्यास असलेल्या वस्तू ह्या स्वगुरुत्वाने गोलाकार प्राप्त करू शकतात.
एखाद्या संस्थेचा गुरुत्वमध्य म्हणजे असा एक बिंदू ज्याठिकाणी त्या संस्थेचे संपूर्ण वजन एकवटल्याचे भासते. जर सारखेच वस्तुमान आणि आकारमान असलेल्या आणि परस्परांपासून क्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन गोलाकार वस्तू एकमेकांभोवती फिरत असतील तर त्या दोन वस्तू मिळून तयार होणा-या संस्थेचा गुरुत्वमध्य हा त्या दोन वस्तूंच्या बरोबर मध्ये, म्हणजेच कोणत्याही एका वस्तूच्या केंद्रापासून क्ष/२ अंतरावर आणि दोन्ही वस्तूंचे केंद्र जोडणा-या रेषेवर असेल. मात्र एक मोठ्या वस्तुमान आणि आकारमानाची वस्तू आणि तुलनेने फारच कमी वस्तुमानाची वस्तू अशी संस्था असल्यास त्या संस्थेचा गुरुत्वमध्य हा दोनी वस्तू जोडणाया रेषेवर, मात्र मोठ्या वस्तूचा आत असेल.
चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात चंद्र आणि पृथ्वी हे त्या दोघांच्या मिळून बनलेल्या संयुक्त संस्थेच्या गुरुत्व मध्याभोवती फिरतात. पृथ्वीचे वस्तुमान आणि आकारमान चंद्राच्या तुलनेत खूपच मोठे असल्यामुळे हा गुरुत्वमध्य पृथ्वीमध्ये, पृथ्वीच्या आत असतो. त्यामुळे चंद्राला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात. शॅरन हा प्लुटोचा उपग्रह आहे असे मानले जाते. प्रत्यक्षात प्लुटो आणि शॅरन हे त्या दोघांच्या मिळून तयार झालेल्या संयुक्त संस्थेच्या गुरुत्वमध्याभोवती फिरतात. प्लुटो हा वस्तुमान आणि आकारमानाने शॅरनपेक्षा मोठा असला तरी दोघांच्या वस्तुमानामधला फरक खूपच कमी आहे. त्यामुळे ह्या संयुक्त संस्थेचा गुरुत्वमध्य प्लुटोमध्ये नसून, बाहेर अवकाशात आहे. हा गुरुत्वमध्य बाहेर असल्यामुळे आवृत्ती व्याख्येनुसार शॅरनला प्लुटोचा उपग्रह म्हणणे योग्य ठरले नसते. त्यामुळे शॅरनला स्वतंत्र ग्रहाचा दर्जा मिळाला असता. मात्र दोघे एकमेकांभोवती फिरतात आणि सूर्याभोवती साधारणपणे एकाच कक्षेत फिरत असल्यामुळे आणि प्लुटो-शॅरन ह्या जोडगोळीला जोडग्रह असे म्हटले गेले असते.
आपल्या सौरमालेमध्ये मंगळ व गुरू ग्रहांदरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे. ग्रहाच्या नवीन व्याख्येनुसार लघुग्रहांच्या पट्ट्यातील सेरेस (Ceres) ह्या लघुग्रहालाही ग्रहाचा दर्जा प्राप्त झाला असता. बहुतेक लघुग्रह हे छोटे-मोठे दगड आहेत. वस्तुमान कमी असल्यामुळे ह्या लघुग्रहांना द्रवस्थैतिक संतुलन प्राप्त झालेले नाही आणि म्हणून त्यांचे आकारही दगडांप्रमाणेच ओबडधोबड आहेत. मात्र सेरेस हा मोठा लघुग्रह गोलाकार असून त्याला द्रवस्थैतिक स्थैर्य प्राप्त झालेले असल्यामुळे सिरसला ग्रहाचा दर्जा द्यावा लागला असता.
प्लुटॉन्स म्हणजे प्लुटोच्या पलिकडे असण्या-या अवकाशातील, मात्र सूर्याभोवती फिरणा-या अवकाशस्थ वस्तू. प्लुटो हा पहिला प्लुटॉन, शॅरन हा दुसरा प्लुटॉन तर “२००३ यूबी ३१३” हा तिसरा प्लुटॉन म्हणून ओळखला गेला असता. प्लुटोच्या अलिकडील ग्रहांना अभिजात ग्रह (बुध ते नेपच्यून, classical planets) असे म्हटले जाते. इ. स. १९०० पूर्वी शोध लागलेल्या ग्रहांना इतिहासकालामध्ये ज्ञात असलेले ह्या अर्थी अभिजात असे म्हटले जात असले तरी तो ह्या ग्रहांचा अधिकृत प्रकार नाही.
२००३ मध्ये माइक ब्राउन (कॅल्टेक), चॅड ट्रुहिलो (जेमिनी वेधशाळा) आणि डेविड रॅबिनोविट्झ (येल विद्यापीठ) ह्यांनी शोधलेल्या “२००३ यूबी ३१३” ह्या वस्तूला आवृत्ती व्याख्येनुसार ग्रहाचा दर्जा मिळाला असता. “२००३ यूबी ३१३” हे तात्पुरते नाव असून त्याचेच “झेना” हे नावही काही प्रमाणात प्रचलित आहे. मात्र ह्या ग्रहाचे अधिकृत नाव लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. झेना हा ग्रह प्लुटोच्या पलिकडे असून प्लुटोपेक्षा आकाराने मोठा आहे.
अशाप्रकारे आवृत्ती व्याख्येनुसार १२ ग्रहांच्या नव्या सौरमालेमध्ये आठ अभिजात ग्रह (classical planets) – बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून, एक बटुग्रह (dwarf planet) – सेरेस आणि तीन प्लुटॉन्स – प्लुटो, शॅरन, २००३ यूबी ३१३ ह्यांचा समावेश झाला असता (आकृती १).
द्वादश ग्रह सारणी -
| ग्रहाचे नाव |
अधिकृत प्रकार |
वर्णनात्मक प्रकार |
सरासरी व्यास (किमी) |
|
बुध |
- |
अभिजात |
४,८७९ |
|
शुक्र |
- |
अभिजात |
१२,१०४ |
|
पृथ्वी |
- |
अभिजात |
१२,७४६ |
|
मंगळ |
- |
अभिजात |
६,७८० |
|
सेरेस |
- |
बटु |
९५२ |
|
गुरू |
- |
अभिजात |
१,३८,३४६ |
|
शनी |
- |
अभिजात |
१,१४,६३२ |
|
युरेनस |
- |
अभिजात |
५०,५३२ |
|
नेप्च्यून |
- |
अभिजात |
४९,१०५ |
|
प्लुटो |
प्लुटॉन |
बटु |
२,३०६ |
|
शॅरन |
प्लुटॉन |
बटु |
१,२०५ |
|
२००३यूबी२१३ |
प्लुटॉन |
बटु |
२,४०० |
आकृती १ – द्वादश ग्रह व सूर्याच्या तुलनेत आकारमान (संदर्भ – इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनमिकल सोसायटीचे संकेतस्थळ)
आवृत्ती व्याख्येनुसार भविष्यकाळामध्ये आपल्या सौरमालेतील ग्रहांची संख्या आणखी २ ते १२ ग्रहांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती (आकृती २). ह्या वस्तूही प्लुटोपलिकडील अवकाशात असल्याने त्या प्लुटॉन्स प्रकारात मोडतील. ह्या वस्तूंविषयी अधिक संशोधन चालू आहे. त्यांची सध्या तात्पुरत्या स्वरूपात वापरात असलेली नावे पुढीलप्रमाणे – २००३ इ एल ६१, २००५ एफ़ वाय ९, सेडना, ऑर्कस, क्वाओर, वरूण, २००२ टी एक्स ३००, इग्झिऑन, २००२ ए डब्ल्यू १९७, वेस्टा, पल्लस, हायजिया.

आकृती २ – आवृत्ती व्याख्येनुसार भविष्यकालीन ग्रह व पृथ्वीच्या तुलनेत आकारमान (संदर्भ – इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संकेतस्थळ)
मात्र आपल्या सौरमालेच्या सभासदसंख्येमध्ये वाढ होईल अशी आशा निर्माण केलेल्या खगोलविदांच्या संमेलनाने शेवटी सभासदसंख्या कमी करण्याचा निर्णय घेतला. प्लुटोला ग्रह म्हणावे अथवा नाही हा तसा जुनाच वाद. १९३० मध्ये प्लुटोचा शोध लागला तेव्हा तो किमान पृथ्वीच्या आकाराचा असावा असा प्राथमिक कयास होता. मात्र हळूहळू त्याच्याबद्दलची अधिक माहिती उजेडात आली. अभिजात ग्रहांच्या तुलनेत प्लुटोचा आकार खूपच लहान आहे. केवळ बुधापेक्षाच नाही तर काही मोठ्या ग्रहांच्या उपग्रहांपेक्षाही प्लुटो आकाराने लहान आहे. अभिजात अष्टग्रहांच्या कक्षा साधारण एकाच प्रतलात आहेत तर प्लुटोची कक्षा ह्या प्रतलाच्या तुलनेत बरीच कललेली आहे. त्यामुळे तसाही प्लुटो हा नेहमीच “ऑड मॅन आउट” होता.
खगोलविदांनी दोन वर्षे खपून तयार केलेली ग्रहाची व्याख्या मान्य झाली असती तर सध्या शॅरन, सेरेस आणि २००३यूबी३१३ चा आणि भविष्यात आणखी ब-याचश्या अवकाशस्थ वस्तूंचा समावेश ग्रह म्हणून सौरमालेमध्ये झाला असता. थोड्याच वर्षात अशाप्रकारे सौरमालेतील ग्रहसंख्या पन्नासाच्या वर गेली असती. प्लुटोपलिकडील अवकाशातले नवेनवे शोध ह्या सदस्य संख्येत भर घालत राहिले असते आणि पाठ्यपुस्तकांमध्ये सतत बदल करावा लागला असता. आता अष्टग्रही सौरमालेसाठी पाठ्यपुस्तके एकदा बदलावी लागतील, मात्र तसे वारंवार होण्याचा धोका तूर्तास टळला आहे.
ग्रहाची नवीन व्याख्या अशी – सूर्याभोवती फिरणारी अवकाशस्थ वस्तू, जिचे वस्तुमान द्रवस्थैतिक संतुलन (Hydrostatic Equilibrium) मिळवण्याएवढे असल्याने तिला गोलाकार/गोलसदृश आकार प्राप्त झाला आहे आणि जिने तिच्या शेजारचा परिसर मोकळा केला आहे अशा वस्तूला ग्रह म्हणावे. प्लुटोकडे पहिल्या दोन गोष्टी असल्या तरी तिसरी नाही, म्हणून प्लुटो हा ग्रह नाही. मात्र त्याला बटुग्रह वा ग्रहबटु (Dwarf Planet) असे म्हणण्यात येईल.
ही नवी व्याख्या वाचल्यावर अनेक प्रश्न मनांत येतात आणि त्यांची समाधानकारक उत्तरे मला सापडलेली नाहीत. पहिला प्रश्न ‘शेजार मोकळा करणे म्हणजे नक्की काय?’ एखाद्या अवकाशस्थ वस्तूने शेजार मोकळा केला आहे वा नाही हे ठरवण्यासाठीचे निकष कोणते? इंटरनॅशनल ऍस्टॉनमिकल युनियन ने ग्रहाची ही नवीन व्याख्या करताना मोकळ्या शेजाराची संकल्पना स्पष्ट केलेली नाही. मंगळ व गुरूदरम्यानचा लघुग्रहांचा पट्टा हा मोकळ्या नसलेल्या शेजाराचे उदाहरण म्हणता येईल. अनेक छोटे मोठे लघुग्रह ह्या पट्ट्यामध्ये फिरत आहेत. त्यातील सेरेससारख्याने ग्रहाच्या व्याख्येतील पहिल्या दोन अटींची पूर्तता केली असली तरी त्याला मोकळा शेजार नाही, म्हणून तो ग्रह नाही. ग्रहाचे उपग्रहही साधारण ग्रहाच्याच कक्षेत सूर्याभोवती फिरतात असे म्हणता येईल. अभिजात अष्टग्रहांपैकी बहुतेकांना उपग्रह आहेत, तरीही ते ग्रह आहेत. म्हणजेच आसपास फिरणा-या वस्तूंना स्वतःच्या अंकित करून, उपग्रह म्हणून त्यांना स्वतःभोवती फिरवत ठेवणे, वा (शनीप्रमाणे) कड्यांच्या स्वरूपात स्वतःभोवती फिरत ठेवणे किंवा (नेपच्यूनने प्लुटोला भिरकावले तसे) त्या वस्तूंना वेगळ्या कक्षेत भिरकावून देणे ह्या शेजार मोकळा करण्यातील काही पाय-या असू शकतात.
प्लुटोच्या कक्षेवर युरेनसच्या गुरुत्वाकर्षणाचा मोठा परिणाम होतो. प्लुटोची कक्षा नेपच्यूनच्या कक्षेला छेदते. म्हणजेच प्लुटोचा शेजार मोकळा नाही म्हणून तो ग्रह नाही. पण मग त्याच न्यायाने नेपच्यूनलाही ग्रह म्हणता कामा नये, नाही का? प्लुटोची कक्षा नेपच्यूनच्या कक्षेला छेदते हेच वाक्य नेपच्यूनची कक्षा प्लुटोच्या कक्षेला छेदते असे उलटे म्हटले तर नेपच्यूननेही त्याचा शेजार मोकळा केलेला नाही असा त्याचा अर्थ होत नाही का? त्यावर असे म्हणता येईल की नेपच्यून आणि प्लुटोची तुलना करता प्लुटो नेपच्यूनपेक्षा खूपच लहान आहे. प्लुटोची कक्षा नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणाने प्रभावित झालेली आहे, नेपच्यूनची कक्षा प्लुटोच्या गुरुत्वाकर्षणाने प्रभावित झालेली नाही, सबब प्लुटो ग्रह नाही, मात्र नेपच्यून हा ग्रह आहे.
मात्र नवीन व्याखेनुसार नेपच्यूनपलिकडील अवकाशातील कोणत्याच वस्तू (ज्यांना क्युपर पट्ट्यातील (Cuiper Belt) वस्तू म्हणतात) ग्रह होऊ शकत नाही. २००३यूबी३१३ ने त्याचा शेजार मोकळा केलेला आहे वा नाही ह्याबद्दल सध्या पुरेशी माहिती उपलब्ध नाही. प्लुटोची कक्षा नेपच्यूनच्या कक्षेला छेदते, तशी ह्या २००३यूबी३१३ ची छेदत नाही. तरीही २००३यूबी३१३ हा ग्रह नाही, असे का? आजपर्यंत सापडलेल्या क्युपर पट्टीय वस्तू आकाराने व वस्तुमानाने खूपच लहान, बुधाहूनही लहान आहेत. त्या वस्तू लहान म्हणून त्यांना ग्रह म्हणायचे नसेल, तर वस्तुमान वा आकारमानाचा निकष व्याख्येत का लिहिलेला नाही? उदाहरणार्थ, ता-याभोवती फिरणारी आणि द्रवस्थैतिक संतुलन असणारी वस्तू जिचे वस्तुमान क्ष किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे (किंवा किमान बुधाएवढे आहे) वा व्यास य किलोमीटरपेक्षा जास्त आहे अशाच वस्तूला ग्रह म्हणावे’ अशाप्रकारे व्याख्या करता आली नसती का? प्लुटोची कक्षा अभिजात ग्रहांच्या कक्षांच्या प्रतलात नाही, तर ती कललेली आहे. क्युपर पट्ट्यातील अनेक वस्तूंच्या कक्षाही ह्या प्रतलात नाहीत. ह्या कारणाने जर त्यांना ग्रह म्हणायचे नाही असे असते तर हीच व्याख्या ‘ता-याभोवती फिरणारी आणि द्रवस्थैतिक संतुलन असणारी वस्तू जिची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा अभिजात ग्रहांच्या कक्षेच्या प्रतलात आहे अशाच वस्तूला ग्रह म्हणावे’ अशी व्याख्या करता आली नसती का? पण अशाने सेरेस ह्या लघुग्रहाला ग्रह म्हणावे लागले असते. मग वस्तुमानाचा आणि कक्षेच्या प्रतलाचा असे दोन्ही निकष घालून केलेली व्याख्या पुरेशी स्पष्ट ठरली असती. मात्र सध्याची व्याख्या पुरेशी समाधानकारक नाही.
आपल्या सौरमालेमध्ये क्युपर पट्ट्यातील वस्तू बुधाहून लहान आहेत. समजा इतर सौरमालांम्धील क्युपर पट्ट्यामध्ये मोठ्या वस्तू असतील, तर त्यांना ग्रह म्हणायचे वा की नाही? असा प्रश्नही उरतोच. थोडक्यात काय तर “मोकळा शेजार” म्हणजे नक्की काय हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत ह्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळणार नाहीत.
द्वादश ग्रहांच्या प्रस्तावामध्ये असलेली ग्रहांची व्याख्या स्पष्ट, निःसंदिग्ध होती. त्या प्रस्तावामध्ये उपग्रहाचीही स्पष्ट व्याख्या केलेली होती, ज्यानुसार शॅरन हा प्लुटोचा उपग्रह न राहता जोडग्रह झाला असता. मात्र ग्रहाच्या नवीन व्याख्येमध्ये उपग्रहाच्या व्याख्येचा अंतर्भाव नाही. त्यामुळे शॅरनला प्लुटोचा उपग्रहच मानायचे काय? हाही आणखी एक प्रश्न, ज्याचे उत्तर होकारार्थी मानायला हरकत नसावी.
आकृती ३. नवी सौरमाला – (सौजन्य इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनमिकल युनियन चे संकेतस्थळ)
भविष्यकाळात ग्रहाची व्याख्या अधिक स्पष्ट, निःसंदिग्ध होईल अशी आशा करू या. तूर्तास प्लुटोला पृथ्वीवासीयांची महादशा चालू आहे असे दिसते!! (त्यासाठी एखादी शांत करण्याचा उपाय माहीत असल्यास कृपया प्लुटोला कळवा.)
-वरदा वैद्य, ऑक्टोबर २००६ । Varada Vaidya, October 2006
संदर्भ -
माहिती - इंटरनॅशनल ऍस्ट्रोनॉमिकल युनियन चे संकेतस्थळ,
हॅलिडे, रेसनिक, “फंडामेंटल्स ऑफ फिजिक्स”, न्यूयॉर्क विली, जॉन्स ऍण्ड सन्स, २००१.
आकृत्या व सारसारणीसाठी – इंटरनॅशनल ऍस्ट्रोनॉमिकल युनियन चे संकेतस्थळ.
0 responses so far ↓
There are no comments yet...Kick things off by filling out the form below.